आमदार अतुल बेनके यांची अधिवेशनात मागणी
नारायणगाव – कांदा पिकाचे शासकीय अनुदान सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. कांदा पीक अनुदान, निर्यातबंदी, बाजार भाव, वडज उपसा सिंचन योजना, आदिवासी भागातील पाणी प्रश्न, बुडीत बंधारे, मांडवी बंधारा, आणे पठार पाणी प्रश्न, चिल्हेवाडी पाणी पुरवठा योजना यासारख्या प्रश्नांवर विधानसभेत 293 अंतर्गत त्यांनी चर्चा केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधेच कांदा विक्री केली, तरच त्यांना शासकीय अनुदान मिळेल अशी अट शासनाने घातली आहे; परंतु शेतमाल विक्रीसाठी सरकारनेच बाजाराचे खुले धोरण स्विकारले असल्याने गावातील तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांच्या पीक नोंदी असतील अशा सर्वच शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले पाहिजे.
तसेच कांदा चाळ अनुदानाची मागणी आणि सरकारी उद्दिष्ट यात मोठी तफावत असल्यामुळे अनेक शेतकरी कांदाचाळ अनुदानापासून वंचित राहत आहे. त्यामुळे कांदा चाळीच्या अनुदानाचे उद्दिष्ट सरकारने वाढवावे, अशी आग्रही मागणी आमदार बेनके यांनी सरकारकडे केली.
जुन्नर तालुक्यात पाच धरणे असूनही धरणातील पाणी खालील गावांना सोडल्यानंतर धरणाच्या पाठीमागच्या गावांना पाणी मिळत नसल्याने आदिवासी भागातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारे बांधण्यात यावेत. माणिकडोह धरणाच्या खोऱ्यात बुडीत बंधारे बांधणे व आदिवासी भागातील कोपरे मांडवे येथील मांडवी नदीवरील बंधाऱ्यासाठी निधी देण्याची मागणी केली.
शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्या
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने मिळणारी पतपुरवठा योजना मागील दोन वर्षांपासून बंद केली आहे. याबाबत जिल्हा बॅंकेकडे विचारणा केली असता त्यांनी केंद्र सरकारने आर्थिक वाटा देण्याचं बंद केल्याने शून्य टक्के व्याज दराची योजना बंद केली असल्याचे सांगितले. आपण सरकारमध्ये सामील झाले असल्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे, अर्थमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन योजना पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आमदार बेनके यांनी नमूद केले.
चिल्हेवाडी जलवाहिनीसाठी 100 कोटी
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची चिल्हेवाडी बंद पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. त्याबद्दल अर्थमंत्री अजित पवार आणि सरकारचे आमदार बेनके यांनी आभार मानले.