काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पत्नीचे आज सकाळी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रदीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीता दहल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान प्रचंड यांच्या पत्नीवर नेपाळच्या नॉर्विक इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, सीता दहल यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासह इतरही काही आजार होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 12 जुलै रोजी सकाळी 8.33 वाजता सीता दहल यांनी अखेरचा श्वास घेतला.
नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीता दहल यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी त्यांना 8.33 वाजता मृत घोषित केलं. सीता दहल यांना प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लियर पाल्सी या आजाराने ग्रासले होते. याशिवाय त्यांना पार्किन्सन्स, डायबिटीज टाईप-2 आणि उच्च रक्तदाब यासारखे आजारही होते. सीता दहल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना भारतातील तसेच नेपाळमधील विविध रुग्णालयांमध्ये नेण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पत्नी सीता दहल या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या सीता दहल यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नीला पार्किन्सन्ससारखी लक्षणं असलेल्या मेंदूच्या आजाराने ग्रासले होते.