पुणे – विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होत अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्ह आपल्यासोबत असल्याचे सांगत आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षाचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं देखील पवार म्हणाले.आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असं अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केल्याने पक्षामध्ये फूट पडल्याचं बोललं जात आहे. अशात शरद पवार यांनी अजित पवारांच्या दाव्यावर भाष्य केले. शरद पवार म्हणाले,”कोणी काहीही दावा करावा माझा लोकांच्यावर विश्वास आहे. राष्ट्रवादी पक्ष आला कसा.. राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता आम्हा लोकांचे काही मतभेद काँग्रेससोबत झाले होते त्यानंतर पक्ष नसताना आम्ही हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे कोणी काहीही क्लेम करो आम्ही लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठींबा मिळवू आम्हाला खात्री आहे लोक आम्हाला नक्की पाठिंबा देतील.”
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.