लंडन – पृथ्वीच्या भूगर्भात माउंट एव्हरेस्टपेक्षा किमान पाचपट उंच शिखर सापडल्याचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केला आहे. हे संशोधन भूगर्भशास्त्रज्ञांनादेखील आश्चर्य वाटावे असे आहे. अत्याधुनिक भूगर्भशास्त्रीय उपकरणांच्या आणि अंटार्टिका येथे वापरल्या जाणाऱ्या डाटा ऍनालिसिस तंत्राच्या साहाय्याने हे संशोधन शक्य झाले आहे.
ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. पृथ्वीच्या पोटात खोल शिरून तेथील रचना समजून घेण्यासाठी केल्या गेलेल्या संशोधनातून हे वास्तव उलगडले आहे. पृथ्वीच्या पोटात इतके उंच शिखर असल्याचा निष्कर्ष खरोखर अत्यंत रहस्यमय वाटावा असा आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
अंटार्टिका येथे करण्यात आलेल्या सुमारे 1 हजार भूकंप मापन रेकॉर्डिंगच्या आधारे “हाय डेफिनेशन इमेजिंग मेथड’चा वापर केल्यावर या शिखराच्या अस्तित्वाची माहिती मिळाली आहे, असे ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे भूभौतिकशास्त्रज्ञ एडवर्ड गार्नेरो यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
या शिखराची जाडी काही किलोमीटरपासून दसपट जास्त किलोमीटरपर्यंत असू शकते. याचा अर्थ आपण एखाद्या पर्वताच्या एखाद्या कड्याजवळ असू शकतो. या पर्वताची उंची काही ठिकाणी माउंट एव्हरेस्टच्या किमान पाचपट अधिक असावी, असा अंदाज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या पोटात एवढ्या उंच पर्वताच्या अस्तित्वामुळे पृथ्वीच्या पोटातून उष्णता कशी बाहेर पडत असेल, या प्रश्नाची उकल करण्यास मदत होईल, असे संशोधकांना वाटू लागले आहे.