मुंबई – पुढील वर्षी होणा-या लोकसभा आणि राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची आज यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभांकडे विशेष पद्धतीने लक्ष देण्यासाठी प्रत्येकी एका नेत्याची निवड निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, प्रसाद लाड, धनंजय महाडिक, विनय सहस्रबुद्धे, मुरलीधर मोहोळ, राहुल कुल, महेश लांडगे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांवर देखील निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व नियुक्त प्रमुखांचे अभिनंदन!
सर्व निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील.… pic.twitter.com/ow7iZXksc1— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 8, 2023
शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार आणि आमदार उपस्थित राहिले होते. यावेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, 48 लोकसभांसाठी निवडणूक प्रमुखांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 288 विधानसभा मतदारसंघासाठी देखील निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या बाबतचे ट्वीट चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून आता शिवसेना आणि भाजप जागा वाटपाबाबत नेमका कोणता तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.