पक्षांतरास बंदी घालण्यास कॉंग्रेस सहमत
लखनौ, दि. 2 – एका पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात जाण्यावर निर्बंध घालण्यास कॉंग्रेस पक्ष सहमत असल्याचे पक्षाध्यक्ष के. ब्रह्मानंद रेड्डी म्हणाले. पक्ष बदलाचे विधेयक आणण्यात जनता सरकारची भूमिका गांभीर्याची आहे अथवा नाही हे आपल्याला माहीत नाही, असे सांगून रेड्डी म्हणाले, तसे विधेयक तयार केलेले असेलच तर त्याची अंमलबजावणी जनता पक्षाच्या सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाच्या वेळेपासून व्हावी. या विषयावर विविध पातळ्यांवर याअगोदरही चर्चा चालू होती.
पाकला अमेरिकन लढाऊ विमाने मिळणार नाहीत
वॉशिंग्टन – पाकिस्तानला अमेरिकेने ए-7 जातीची 110 लढाऊ विमाने देण्याचे योजिले होते; परंतु तो निर्णय आता कार्टर सरकारने रद्द केला आहे, असे आज सांगण्यात आले. कार्टर यांच्या नव्या शस्त्रनियंत्रण धोरणानुसार हा विमानविक्रीचा निर्णय रद्द केल्याचे सांगण्यात आले.
कोयना भूकंपग्रस्तांचे कर्ज माफ केले
मुंबई – कोयना भूकंपग्रस्त कुटुंबांना घरांसाठी प्रत्येकी 1500 रुपये कर्ज देण्यात आले होते. ते कर्ज आता माफ करण्यात आले आहे.