मुंबई : ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा केला जाणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2 जून) सायंकाळी 5.30 वाजता तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
2 जून हा तेलंगणा राज्य स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा केला जाणार आहे. दिनांक 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.
राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’ नृत्य, ‘बथकम्मा’ व ‘बोनालू’ नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती व्हावी हा आयोजनामागचा उद्देश आहे.
राजभवन तसेच तेलंगणा शासन व फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (F – TAM) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.