नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करता येईल इतके सबळ पुरावे नाहीत, हे जे पोलीस सांगत आहेत ही चक्क थापेबाजी आहे. त्यांच्याविरोधात खटला दाखल झालेला आहे, आमचे जबाब नोंदवून घेतलेले आहेत मग तरीही ही लपवाछपवी का सुरू आहे, अशा शब्दांत आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच ताशेरे मारले आहेत.
हे एक संवेदनशील प्रकरण असून ते योग्य व्यक्तीच्या हातीच दिले गेले पाहिजे. सध्या जे पोलीस या प्रकरणाशी संबंधित आहेत ते ब्रिजभूषण यांना अटक करण्यास टाळाटाळ करीत आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालय व केंद्र सरकार यात कधी लक्ष घालणार आहे.
केवळ आमच्यापैकी काही कुस्तीपटूंना एकेकाला बोलावले गेले व त्यांचे जबाब नोंदवले गेले मात्र, पुढे काहीही घडले नाही. त्यातच सबळ पुरावे नसल्याची बतावणी आता पोलीस करत आहेत. हे सगळे काय सुरू आहे, असा सवालही या कुस्तीपटूंनी विचारला आहे.
देशासाठी मिळवलेली पदके गंगा नदीत प्रवाहित करण्याचा निर्णय या कुस्तीपटूंनी शेतकरी संघटनांच्या मध्यस्थीनंतर बदलला व सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
आज दुसरा दिवस असून येत्या रविवारपर्यत ठोस निर्णय घेतला गेला नाही किंवा त्याबाबत काही घोषणा करण्यात आली नाही तर विरोध असूनही इंडिया गेटवर आमरण उपोषण सुरू करू; परंतु आता मागे हटणार नाही, असा इशारा या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा दिला आहे.
या कुस्तीपटूंनी आंदोलन करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची समजूत घालण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. या समितीने या कुस्तीपटूंना एकेकाला बोलावून जबाब देण्यास सांगितले होते मात्र, आम्ही सगळे एकत्रितच जबाब देऊ असे कुस्तीपटूंचे म्हणणे होते.
ते फेटाळण्यात आले व पुरुष सदस्यांच्या उपस्थितीतच हे जबाब नोंदवून घेण्यात आले होते. यावर विनेश फोगट व साक्षी मलिकने आक्षेपही घेतला होता. मात्र, त्यावेळी त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले गेले नाही. त्यामुळेच हे प्रकरण वाढले.
माहिती उघड करणाऱ्याच्या अटकेची मागणी
ज्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने ब्रिजभषूण यांच्या विरोधात दावा दाखल केला होता तिच्याशी संबंधित काही कागदपत्रे माध्यमांकडे कशी पोहोचली. त्यामुळे या महिला कुस्तीपटूची ओळख सिद्ध झाली. ज्या कोणी हे केले त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाने केली आहे.
मी काहीही चुकीचे कृत्य केलेले नाही – ब्रिजभूषण
मी कोणताही गुन्हा केलेला नाही. कोणत्याही महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केलेले नाही. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. काही लोकांना मी महासंघाच्या सर्वोच्च पदावर नको होतो, त्यामुळेच हे सर्व सुरू आहे. तपास करा, चौकशी करा जर त्यात मी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर मी स्वतःच फाशी घेईन, असे मत ब्रिजभूषण यांनी व्यक्त केले आहे.