मंचर – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलवरून राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळत आहे. गौतमी पाटीलवरून दोन पाटलांमध्ये जुंपली असल्याने नागरिकांमध्ये करमणुकीचा विषय बनला आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमापेक्षा जास्त गर्दी होत असते, असा टोला लगावला होता. नृत्यांगना गौतमी पाटील यांना समर्थन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा टोला लगावला आहे.
यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लांडेवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना समाचार घेत खेडचा आमदार दिलीप मोहिते हा एक वादग्रस्त विषय असून मोहितेंनी गौतमीची तुलना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर करणे हे चुकीचे आहे, तसेच खेडचे आमदार हे अज्ञानी असून तो वेड्यांच्या नंदनवनामध्ये जगत असल्याचे देखील आढळराव पाटील म्हणाले आहेत. यामुळे आमदार आणि खासदार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.
गौतमीचे मौन, राजकारणात एण्ट्री करणार का?
यावर गौतमी पाटील हिने यावर प्रतिक्रिया देणे टाळले असून, प्रक्षकांचे माझ्यावर प्रेम असल्याने माझ्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याचे ती म्हणाली आहे. मात्र, येणाऱ्या काळात नृत्यांगना गौतमी पाटील राजकारणात एण्ट्री करणार का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.