मुंबई – मोबाईल व्यसन आणि तरुणाई आज हा विषय एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत आहे. एकदा का व्यसन लागले की व्यक्ती मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच व्यस्त असतात. यामध्ये सर्वात जास्त तरुणाईची संख्या आहे. अशात तरुण मुला मुलींना मोबाईल थोडा कमी वापरण्याचा सल्ला पालकांनी किंवा शिक्षकांनी दिला तर ते आत्महत्याही करतात अशा अनेक घटनाही घडल्या आहे.
अशात अशीच एक घटना दक्षिण आफ्रिकन देश गयानामध्ये घडली आहे. रात्री उशिरा एका शाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. या अपघातात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात तपास अधिकाऱ्यांना मोठा पुरावा सापडला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने ही आग लावल्याचे त्यांनी सांगितले.
यामागचे कारणही मनाला चटका लावणारे आहे. शाळेच्या प्रशासनाने तिचा मोबाईल जप्त केल्यामुळेच आरोपी विद्यार्थिनीने आग लावली. विद्यार्थिनीचे एका मोठ्या व्यक्तीवर प्रेम असल्याचे शाळा प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी तिचा मोबाईल जप्त केला.
गयानाच्या महदिया माध्यमिक विद्यालयात रविवारी रात्री उशिरा बंद मुलींच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत अनेक जण जखमी झाले. गयानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेराल्ड गौवेया यांनी सांगितले की, ‘संशयित विद्यार्थिनी सुमारे 14 वर्षांची आहे. तिचा फोन हिसकावून घेतल्यामुळे तिने मुलींचे वसतिगृह पेटवून देण्याची धमकी दिली होती.’
मात्र, आगीमुळे आरोपी विद्यार्थिसुद्धा जखमी झाली आहे, तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर तिला ताब्यात घेण्यात येणार आहे.