मुंबई – ‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ‘द केरला स्टोरी’ च्या प्रमोशनमध्ये सतत व्यग्र असल्याने त्यांचा प्रवास सुरू होता. याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे म्हंटले जात आहे.
याशिवाय ‘द केरला स्टोरी’ सिनेमाच्या वादामुळे देखील ते तणावात असल्याचे बोलले जात आहे. त्या वादाचा परिणाम सुदीप्तो यांच्या प्रकृतीवर झाला आहे. सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन आणि इतर गोष्टी काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. याआधी दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेत सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. त्यादरम्यान त्यांचा अपघात झाला होता. सुदीप्तो सेन यांनी ट्वीट करत अपघाताबद्दल माहिती दिली होती.
दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काहींनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका सोशल मीडियाद्वारे केली आहे. या चित्रपटाविरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली आहेत. मात्र असे असूनही ‘द केरला स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.
‘द केरला स्टोरी’वर यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ती बंदी उठवण्यात आली आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने एका महिन्याच्या आतच 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ 15 ते 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता.