मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देभभरातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठक होताना पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपा, शिंदे गटासह त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचा शिंदे गट लोकसभेच्या २२ जागांसाठी अग्रही असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भाजपा-शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेला प्रहार जनशक्ती पक्ष लोकसभेच्या एका जागेसह महाराष्ट्रभर विधानसभेच्या १५ ते २० जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली.
बच्चू कडू यांनी याविषयी बोलताना, ‘आम्ही आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलोय. काल आमची एक बैठक पार पडली. त्यानंतर आता आम्ही विधानसभेच्या १५ ते २० जागा लढवणार आहोत. तर शक्य झाल्यास लोकसभेची एक जागा लढवण्याची आमची तयारी आहे. आम्ही सगळे पक्ष जे सत्तेत आहोत, त्यात भाजपा असेल, शिंदे गट असेल या सर्वांशी चर्चा करू. घटकपक्ष म्हणून या सगळ्याला कशा पद्धतीने सामोरं जाता येईल त्याची तयारी सुरू आहे.”,असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले,”सध्या तरी तशी परिस्थिती आहे. आमही एकत्र लढण्याची तयारी आहे. आमची युती नाही झाली तरी आमची तयारी आहे. बच्चू कडू म्हणाले, लोकसभेला आम्ही अमरावती जागेसाठी अग्रही आहोत. विधानसभेला अमरावतीतल्या अचलपूरसह आणखी एक जागा. अकोल्यातल्या दोन, वाशिममधील एक, नागपुरातली एक, नाशिक, सोलापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात १५ ते २० जागा लढण्याची आमची तयारी आहे.” असे म्हटले. तसेच आमची अमरावती लोकसभा लढवण्याची ताकद आहे. मी स्वतः याआधी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढलो आहे. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय मी तेव्हा लढलेलो. तेव्हा केवळ ५ हजार मतांनी मी पराभूत झालो होतो,अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.