आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी सोहळाप्रमुख म्हणून अॅड. विकास ढगेपाटील यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जूनला प्रस्थान होणार आहे. तर 29जून ला आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. ढगेपाटील यांनी यापूर्वी दोन वेळा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त व तीन वेळा पालखी सोहळाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे संस्थान कमिटीच्या बैठकीत त्यांची चौथ्यांदा पालखीसोहळा प्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
सोहळाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर ढगे पाटील म्हणाले की, “पालखी प्रस्थानापासून सोहळा पंढरपूरात दाखल होईपर्यंत व त्यानंतर पंढरपूरहून सोहळा आळंदीत येईपर्यंत सोहळ्यासोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. संपूर्ण सोहळा वैभवात, आनंदात, शिस्तीत व जल्लोषात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनासोबत समन्वय ठेवून प्रत्येक वारकऱ्याला सोयी सुविधा कशा मिळतील याबाबत काटेकोर नियोजन केले जाईल.”
आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांना मुदतवाढ –
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या 3 विश्वस्तांना मुदतवाढ देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा कार्यकाल पूर्ण झालेल्या तीनही विश्वस्तांना पुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मुदतवाढ दिली असल्याचे प्रमुख विश्वस्त विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांचा 16 मे 2023 पर्यंत विश्वस्तपदाचा कार्यकाळ होता. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत एकूण विश्वस्त संख्या सहा आहे. सर्व सहा ही विश्वस्तांची मुदत संपली असून सध्या सहा पदे रिक्त होत आहेत. या सहा पैकी तीन विश्वस्त पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर आषाढी पायी वारी सोहळा आला आहे. या दरम्यान विश्वस्त पदे रिक्त असणे अडचणीचे ठरणारे होते. या हेतूने सध्याच्या विश्वस्तांना मुदत वाढ देण्यात आली आहे.