ढाका – बांगलादेशच्या रॅपिड ऍक्शन बटालियनने शनिवारी कॉक्स बाजार परिसरातून आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रगचा साठा जप्त केला. तब्बल 120 कोटी रुपयांची आईस म्हणून ओळखल्या जाणारी 24 किलो क्रिस्टल मेथ जप्त करण्यात आली आहे. ही जप्ती ही देशातील आतापर्यंतची क्रिस्टल मेथची सर्वात मोठी वसुली आहे, असे रविवारी कॉक्स बाजार येथे प्रसारमाध्यमांना माहिती देताना, “आरएबी’च्या कायदेशीर आणि मीडिया टीमचे संचालक कमांडर खंडेकर अल मोईन म्हणाले.
गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. कॉक्स बजारमधील एका बांधकाम सुरू असलेल्या घरातून या रॅकेटशी संबंधित चार सूत्रधारांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण पूर्वी बांगलादेशच्या पोलीस दलात कार्यरत होता. तेंव्हा अमली पदार्थांची तस्करी केल्याबद्दल 2017 मध्ये त्याला सेवेतून काढून टाकण्यात आले होते, असे “आरएबी’च्या कमांडरांनी सांगितले.
क्रिस्टल मेथच्या तस्करीमध्ये 10 ते 12 जणांची टोळी कार्यरत आहे. यापूर्वी 26 एप्रिलला बांगलादेशच्या बॉर्डर गार्डने 21 किलो क्रिस्टल मेथ चा साठा जप्त केला होता.क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ अत्यंत हानीकारक आणि व्यसनाधीनता वाढवणारा पदार्थ आहे. याच्या सेवनामुळे गंभीर मानसिक आजारदेखील होण्याचा धोका असतो.