हैदराबाद – कर्णधार एडन मार्करम, हेनरीच क्लासेन यांच्यासह अब्दुल समदने केलेल्या उपयुक्त फलंदाजीनंतरही सनरायझर्स हैदराबादला गुरुवारी आयपीएल स्पर्धेतील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सकडून अवघ्या 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मयंक आग्रवालने अभिषेक शर्मासह 29 धावांची सलामी दिली. शर्मा 9 तर आग्रवाल 18 धावांवर परतले. तर पाठोपाठ 20 धावांवर राहुल त्रिपाठीही परतला. भरात असलेल्या हॅरी ब्रुकनेही साफ निराशा केली.
यावेळी हैदराबादची 4 बाद 54 अशी बिकट स्थिती बनली होती. यावेळी यावेळी एडन मार्करमच्या साथीत हेनरीच क्लासेन खेळत होता. क्लासेन वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात क्लासेन 20 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांसह 36 धावा करुन परतला. त्यानंतर अब्दुल समदने मार्करमला साथ दिली. स्थिरावलेला मार्करमच संघाचा विजय साकार करणार असे वाटत असतानाच 41 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 40 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार फटकावले.
यावेळी त्यांना 18 चेंडूत 26 धावांची गरज होती. खेळपट्टीवर समदला साथ देण्यासाठी मार्को जेन्सन दाखल झाला. मात्र, त्यालाही फारशी चमक दाखवता आली नाही व तो लगेचच परतला. पाठोपाठ समदही 18 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा करून परतला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मयंक, मार्कंडेय यांनी प्रयत्न केले मात्र ते पुरेसे ठरले नाहीत व हैदराबादला 5 धावांनी हा सामना गमवावा लागला.
तत्पूर्वी, रिंकू सिंग व कर्णधार नितीश राणा यांच्यासह आंद्रे रसेलने केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 172 धावा करण्याचे माफक आव्हान ठेवले.
कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. मार्को जेन्सनने रेहमनुल्ला गुरबाज व व्यंकटेश अय्यर यांना बाद केले.त्यानंतर जेसन रॉयचा अडसर दूर केला. यावेळी कोलकाताची स्थिती 3 बाद 35 अशी बनली होती. यावेळी कर्णधार नितीश राणा व भरात असलेला रिंकू सिंग ही यशस्वी जोडी खेळपट्टीवर जमली. या जोडीने डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
राणा अनावश्यक फटका मारून 42 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 31 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 3 षटकार फटकावले. यावेळी अनुभवी आंद्रे रसेलने आक्रमक खेळी करत रिंकू सिंगसह संघाला शतकी मजल मारून दिली.
रसेल तुफानी फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात 15 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकारांसह 24 धावा करून बाद झाला. पाठोपाठ सुनील नरेननेही निराशा केली. एका बाजूला रिंकू सुरेख फलंदाजी करत होता. शार्दुल ठाकूरनेही निराशा केली. रिंकूने संघाचे दीडशतक फलकावर लावले.
मात्र, एकेक फलंदाज बाद होत असल्याने धावसंख्या वाढवण्यासाठी रिंकूने धोका पत्करून फलंदाजी केली. याचमुळे तो 46 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 35 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतरच्याच चेंडूवर हर्षित राणा धावबाद झाला व कोलकाताचा डाव 9 बाद 171 असा रोखला गेला. अनुकुल रॉय 13 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून मार्को जेन्सन व टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
लक्षवेधी
गुणतालिकेत प्रगतीची दोन्ही संघांना संधी
कोलकाताच्या रेहमनुल्ला गुरबाज व अय्यरकडून निराशा
मार्को जेन्सनची
भेदक गोलंदाजी
रिंकू व राणाचे
अर्धशतक हुकले
मयंक आग्रवाल
पुन्हा अपयशी
ब्रुक व त्रिपाठीकडूनही निराशा
मार्करम व क्लासेनची उपयुक्त खेळी
समदचे प्रयत्नही अपुरे