मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान लवकरच अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. मात्र त्याआधी सुहानाने मोठ्या ब्रँडशी हातमिळवणी केली आहे. सुहाना खान न्यूयॉर्क स्थित ब्युटी ब्रँड मेबेलाइनचा नवा चेहरा बनली आहे. ब्युटी ब्रँड मेबेलाइन या इव्हेंटमध्ये केवळ सुहानाच्या हसण्यानेच नाही तर तिच्या लूकनेही चाहत्यांना वेड लावले आहे. इतकंच नाही तर ती दुसरी दीपिका पदुकोण बनणार असल्याचंही चाहते बोलत आहेत.
पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुहाना खान या कार्यक्रमासाठी एंट्री करताना दिसत आहे. यादरम्यान ती लाल रंगाच्या सूटमध्ये दिसली, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. शाहरुख खानच्या लेकीचे व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सुहाना खानने नुकतेच एनवायसीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, सुहानाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतले आहे. तर 2021 मध्ये ती भारतात परतली. त्याचवेळी, द आर्चीज या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनासह ती अभिनय विश्वात पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या चित्रपटात सुहाना खान व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर देखील पदार्पण करणार आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.