नवी दिल्ली – हाय-प्रोफाइल लोकांना 200 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घालणारा आणि बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला ‘सुकेश चंद्रशेखर’ याने गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचीच झोप उडवली आहे. सध्या सुकेश चंद्रशेखकर याला दिल्लीच्या मंडोली कारागृहात ठेवण्यात आलं आहे. तुरुंगात देखील तो सर्व सुखसुविधा उपभोगत असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसून आलं होत.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्रींना आपल्या प्रेमाच्या जाळयात अडकवणाऱ्या सुकेश चंद्रशेखर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश चंद्रशेखर दिल्लीच्या रोहिणी कारागृहात असताना तुरुंगातून खंडणीचे मोठे रॅकेट चालवत होता. यासाठी सुकेश हा तुरुंग अधिकाऱ्यांना कोट्यावधींची लाच देत होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
रोहिणी कारागृहातील तीन तुरुंग अधिकाऱ्यांच्या मदतीने महाठग सुकेश तुरुंगातून खंडणीचे रॅकेट चालवत होता. 2020-21 च्या काळात हे रॅकेट चालवण्यात येत होते. यासाठी रोहिणी कारागृहाच्या तीन अधिकाऱ्यांनी कोट्यावधींची लाच घेऊन सुकेशला मदत केली होती. आयफोन, स्वतंत्र बॅरेक यासारख्या अन्य अनेक बेकायदेशीर सुविधा देखील त्याने तुरुंग अधिकाऱ्यांशी संगनमत करून मिळवल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुंदर बोरा, महेंद्र प्रसाद सुंदरियाल आणि धरम सिंग मीना’ अशी या तीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. या तीन अधिकाऱ्यांना 7 फेब्रुवारी 2023 रोजी तुरुंगातील नियम आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. सध्या त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले असून ते तिहार तुरुंगात आहेत.