मुंबई – भारतातील विविध बॅंकांतील खात्यामध्ये दावा न केलेली 35 हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. अगोदर एखाद्या खातेधारकाला आपल्या खात्यासंदर्भात किंवा रकमेसंदर्भात माहिती मिळवायची असेल तर विविध बॅंकांच्या वेबसाईटवर जाऊन माहिती संकलित करावी लागत होती. हे गुंतागुंतीचे आणि जे जिकीरीचे काम होते. मात्र आता रिझर्व्ह बॅंक यासाठी एक पोर्टल सुरू करणार असून या पोर्टलवर अशी माहिती उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेतर्फे देण्यात आली.
पतधोरणानंतर पत्रकाराशी बोलताना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली. एखाद्या बॅंकेतील एखाद्या खात्यात दहा वर्ष काहीच व्यवहार झाला नाही तर या खात्यातील रक्कम दावा न केलेली रक्कम असे समजले जाते. काही खातेदारांना या संदर्भात उशिरा आठवण येते. मग ही रक्कम काढण्यासाठी त्यांना बरीच धावपळ करावी लागते.
यासाठी बरेच पेपरवर्क असते. मात्र आता यातील काही अडचणी कमी होणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने यासाठी एक केंद्रीय पोर्टल सुरू केल्यानंतर प्रत्येकाला आपल्या खात्यातील रक्कम पाहण्यासाठी या पोर्टलवर गेल्यानंतर ती माहिती उपलब्ध होऊ शकेल.
दहा वर्षे एखाद्या खात्यामध्ये व्यवहार झाला नाहीतर बॅंका ही रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे सोपवतात. फेब्रुवारी 2023 पर्यंत या वर्षात बॅंकांनी 35 हजार कोटी रुपयांची रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे सोपवली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत ही रक्कम 48,272 कोटी होती. मात्र हे पोर्टल सुरू करण्याचे काम चालू आहे का ते नेमके कधी सुरू होईल या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडून तपशील उपलब्ध झाला नाही. हा तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.