उन्हाळा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि अजून किमान दोन महिने पारा चढतच राहणारंय. “किमान’ शब्द वापरण्याचं कारण असं की, आजकाल पावसासाठी जून महिन्यावर भरवसा ठेवता येत नाही. किंबहुना जून कोरडाच जातो आणि जून-जुलैच्या पावसाची बेरीज जुलैमध्ये पाहायला मिळते.
जलवायू परिवर्तनामुळे ही अनियमितता उत्तरोत्तर वाढतच जाईल, असं तज्ज्ञ सांगतात. अर्थात आपल्या प्राधान्यक्रमाच्या विषयांमध्ये अद्याप त्याचा समावेश झालेला नाही. कारण टोकाच्या प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यासाठी असंख्य गोष्टी आम्ही विकत घेऊ शकतो, याचा मानवजातीला सार्थ अभिमान आहे. ज्याच्याकडे फ्रीज नाही, तोही माठातलं पाणी आणि रस्त्यावर मिळणारा बर्फाचा गोळा हातात धरून आग ओकणाऱ्या सूर्याला वाकुल्या दाखवतो. पंखे पुरेनासे झाल्यामुळे अनेकांनी कूलर आणि एसी बसवलेत. पण उकाड्याचा त्रास सहन करण्यासाठी वाळ्याचे पडदेही एकेकाळी पुरत होते, असं कुणी म्हटलं तर आम्ही त्याला “नॉस्टॅल्जिक’ म्हणून वेड्यात काढतो.
काळाबरोबर राहायचं म्हटलं तर बदलांना पर्याय नाही, हे गृहित धरलं पाहिजे आणि वातावरणातले बदल याला अपवाद नाहीत. असो… तर उन्हाळ्यात कोरडे पडणारे घसे ओले करण्यासाठी लिंबू सरबतापासून कार्बनयुक्त कोल्ड्रिंकपर्यंत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.
“नॉस्टॅल्जिक’ लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती अशी की, पूर्वी बुंदीचे लाडू करण्यासाठीही आचाऱ्याला बोलवावं लागत होतं. आज पिझ्झा, पास्तापासून अनेक विदेशी पदार्थ गृहिणी स्वतः बनवू लागल्यात. दोन मिनिटांत फक्त नूडल्स तयार होत होते; पण आता चक्क बिअर दोन मिनिटांत तयार होणारंय, तीही घरच्या घरी..!
ही बातमी ऐकल्याबरोबर किती टक्के लोकांचे कान उभे राहिले आणि किती जणांना मनापासून आनंद झाला, याचं सर्वेक्षण एकदा करून पाहाच! डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ही बातमी अनेकांनी आपापल्या मित्रांना लगेच फॉरवर्ड केली. उत्तरादाखल अनेकांनी आपल्या मित्राला “कधी येऊ?’ असा संदेश पाठवला. “चिल्ड’ हा शब्द जरी उच्चारला तरी बिअरचा फेसाळणारा ग्लासच अनेकांच्या डोळ्यासमोर येतो.
भलं होवो त्या जर्मन कंपनीचं (स्पेलिंगवरून नाव उच्चारणं किंवा लिहिणं जवळजवळ अशक्य आहे.) या कंपनीनं बिअरची चक्क भुकटी बनवली. आजवर केवळ दुधाची भुकटी आपल्याला माहीत होती. आणीबाणीच्या वेळी ती पाण्यात टाकून दूधही अनेकांनी बनवलं असेल; पण बिअरची पावडर हा शोध त्याहून कितीतरी श्रेष्ठ..(?) बिअरची ही भुकटी तूर्तास अल्कोहोलविरहित असली तरी अल्कोहोलयुक्त पावडर लवकरच येईल. (आणावीच लागेल?)
बिअरची बाटली दुकानातून विकत घेताना आजूबाजूच्या अनोळखी लोकांना पाहूनसुद्धा अनेकजण दचकतात. काहीजणांना दुकानातला सीसीटीव्ही कॅमेराही नकोसा होतो. शिवाय एवढी मोठी बाटली खिशात मावत नाही आणि वजनदार बाटली घरापर्यंत अत्यंत काळजीपूर्वक वाहून न्यावी लागते. हे सगळंच टळणार म्हणून शौकिनांचा आनंद बाटलीत मावेनासा झालाय(?)