क्विटो (इक्वेडोर) – इक्वेडोरच्या दक्षिणेकडील भागाला आणि पेरुच्या उत्तरेकडील भागाला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
अनेक ठिकाणचा वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर इतकी होती आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागराच्या किनाऱ्याजवळ इक्वेडोरमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ग्युयाकिलपासून 50 किलोमीटर अंतरावर होता, असे यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे.
भूकंपामुळे पेरूमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित मृत्यू इक्वेडोरमध्ये झाले आहेत. तर किमान 126 जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हा भूकंप इक्वेडोरच्या रहिवासांसाठी एक धोक्याची सूचना होती, असे इक्वेडोरचे अध्यक्ष गिलेरमो लासो यांनी म्हटले आहे. इक्वेडोरमध्ये काही पूल आणि सार्वजनिक बांधकामांचे नुकसान झाले. काही रुग्णालये आमि शाळांच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भिंती पडल्या तर भुयारी बोगदे बंद करावे लागले आहेत.
पेरूमध्ये हा भूकंपाचा धक्का उत्तरेला इक्वेडोरच्या सीमेजवळ जाणवला, असे पेरूचे पंतप्रधान अल्बेर्टो ओट्रोला यांनी म्हटले आहे. या भूकंपामुळे त्सुनामी लाटांचा धोका नसल्याचे इक्वेडोरच्या ऍडव्हर्स इव्हेंट मॉनिटर डायरेक्टोरेटने म्हटले आहे.