पिंपरी – आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 16 दिवस बाकी असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने मालमत्ता वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने आत्तापर्यंत जप्ती मोहीम, नळ कनेक्शन बंद करणे या सारख्या कठोर कारवाया सुरू असतानाच आता प्रत्येक झोनमधील मोठे थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून आपल्या नावाची अपप्रसिद्धी टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 5 लाख 92 हजार मिळकती आहेत. पालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने कर वसुलीसाठी शहरात 17 झोन कार्यरत आहेत. यावर्षी या विभागाने 1 हजार कोटी रूपयांचे उदिष्ट ठेवले आहे. आत्तापर्यंत 681 कोटी रूपयांची वसुली झाली आहे. शहरातील मोठ्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये वर्तमानपत्रामध्ये निवासी मालमत्ताधारक, दुकानदार, उद्योजक, मोकळ्या जमिनींचे मालमत्ता धारक, विविध संस्था, बॅंक आदी थकबाकीदार मालमत्ताधारकांची नावे आहेत.
2022-23 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 15 दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत जास्तीत-जास्त कर वसुलीचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी थकित मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना मदत होण्यासाठी विभागाने अधिकचे कॅश काऊंटर वाढविले आहेत. तसेच त्याची वेळ सुद्धा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरिकांना कर भरता येणार आहे.
आत्तापर्यंत वाकड, भोसरी आणि मोशी, पिंपरी, खराळवाडी, संत तुकारानगर या विभागातील थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. थकबाकीदारांची एकूण अंदाजे 50 कोटी रुपये थकीत रक्कम येणे बाकी आहे. या आठवड्यापासून सर्व विभागांची एक लाखाच्या पुढे मूळ कराचा भरणा बाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.
कर संकलन विभागाकडून जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे यासारख्या कठोर कारवाया चालूच आहेत. त्या अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांची नावे प्रसिध्द करणे हा या कारवाईचा एक भाग आहे. आपल्या नावाची अपप्रसिद्धी टाळण्यासाठी करांचा तातडीने भरणा करावा. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
1200 मालमत्ता जप्त
गेल्या चार ते पाच वर्षांपासून मालमत्ता कर न भरलेल्या मिळकत धारकांवर जप्तीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. पालिकेच्या कर संकलन विभागाने आत्तापर्यंत तब्बल 1200 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मालमत्ता जप्तीनंतरही कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा 1 एप्रिलपासून लिलाव सुरू करण्यात येणार आहे.
12 हजार मिळकत धारकांकडे 160 कोटींची थकबाकी
1 लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्या 12 हजार मिळकतधारकांकडे तब्बल 160 कोटींची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्यास सुरूवात केली आहे. यापैकी बुधवारअखेर 2 हजार पेक्षा जास्त थकबाकीदारांची नावे प्रसिध्द झाली आहेत. वर्तमान पत्रात नावे येताच काही जणांनी कर भरला आहे. त्यामुळे वर्तमान पत्रातून आपल्या नावाची अपप्रसिद्धी टाळण्यासाठी थकबाकीदारांनी त्वरीत कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.