कराड – धोंडेवाडी (ता. कराड) येथील ढोकरमाळ नावाच्या शिवारामध्ये विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याचा बछडा विहिरीत पडला असल्याची शक्यता असून शनिवारी सकाळी ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकरी, ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील धोंडेवाडी व नांदगाव खिंड यादरम्यान धोंडेवाडी गावच्या हद्दीत ढोकरमाळ नावाचे शिवार आहे. या शिवारात विश्वनाथ महिपती काकडे या शेतकऱ्याची विहीर आहे. काकडे शनिवार दि. 4 रोजी पहाटेच्या सुमारास विहिरीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीच्या पाण्यात मृतावस्थेतील बिबट्या पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काकडे यांनी तात्काळ घटनेची माहिती अन्य शेतकऱ्यांना दिली.
तसेच याबाबत वन विभागालाही कळवण्यात आले. त्यांनतर कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अभिजित शेळके, सुभाष गुरव, सचिन खंडागळे, वनसेवक अमोल माने यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच मृत बिबट्याला जाळीच्या साह्याने विहिरीवर बाहेर काढून वन विभागाने ताब्यात घेतले. हा मृत बिबट्या सात आठ महिन्यांचा मादी बछडा असून त्याचे अंदाजे वजन 15 ते 20 किलो आहे.
तसेच बिबट्याचा बछडा शिकारीच्या शोधात किंवा पाठलाग करताना विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज तुषार नवले यांनी यावेळी व्यक्त केला. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धोंडेवाडीचे ग्रामस्थ धनाजी गावडे, भरत पवार, योगेश बडेकर, हनुमंत मिठारे व शेतकऱ्यांच्या मदतीने बछड्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वीच तालुक्यातील चचेगाव येथे सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच धोंडेवाडी येथे बिबट्याच्या बछड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे वन विभागाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्राणीप्रेमींमधून होत आहे.