प्रत्येक राज्यात एक औषधांचा कारखाना?
इंदूर, दि. 2 – नियोजन मंडळाने मान्यता दिली, तर प्रत्येक राज्यात सार्वजनिक क्षेत्रात औषधांचा एक-एक कारखाना काढण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे केंद्रीय रसायने व खत खात्याचे मंत्री पी. सी. सेठी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, या कारखान्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये खर्च येईल. सेठी पुढे म्हणाले की, राज्य सरकारांना या उभारणीखर्चात अर्धा वाटा उचलावा लागेल. या प्रत्येक कारखान्यातून दरसाल 2 कोटी रुपये किमतीचे औषधे तयार होतील. केरळमध्ये अशा तऱ्हेचा प्रयोग यशस्वी झालेला आहे. आता अशाच प्रकारचा प्रयोग इतर राज्यांमध्येही यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाकमध्ये डॉक्टरांना लष्करात सेवेची सक्ती
नवी दिल्ली – पाकिस्तान सरकारने देशातील सर्व डॉक्टरांना 2 वर्षे लष्करात सेवा करण्याची सक्ती केली आहे, असे पाकिस्तान नभोवाणीवरून सांगण्यात आले. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांत लष्करी शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. अधिकाधिक तरुणांनी लष्करात जावे यासाठी ही सक्ती आहे. पाक लष्कराची शक्ती वाढावी असा प्राथमिक उद्देश त्यामागे आहे.
वैष्णव-शैव हिंदू धर्माचे दोन डोळे
मद्रास – वैष्णव-शैव हे हिंदू धर्माचे दोन डोळे आहेत. या दोन्ही पंथांची बाह्य लक्षणे व मार्ग भिन्न असले तरी त्यांचे अंतिम ध्येय एकच आहे, असे उद्गार कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी काढले.