नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात एक तरुण दुसऱ्या तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडीओतील तरुण हा भाजप खासदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून सर्वत्र टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपकडून थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवरच आरोप करण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ दिग्दर्शक-निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करून तेलंगणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बांडी संजय कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये संजय कुमार यांचा मुलगा भगीरथ दुसऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करताना आणि त्याच्यावर दादागिरी करताना दिसत आहे. तसेच, यावेळी भागीरथचे काही मित्रही या मुलावर दादागिरी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
I thought the days of Iraq dictator #Saddam ‘s like sons #UdayHussein were over and now he is reincarnated as @bandisanjay_bjp ‘s son #bhageerqth who as a son YUCKED his FATHER pic.twitter.com/Btzfc4i8ya
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 17, 2023
दरम्यान, ही घटना घडून काही दिवस उलटल्याचा दावा बांडी संजय कुमार यांनी केला आहे. याविषयी बोलताना,“हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. पण त्याचा व्हिडीओ आत्ताच कसा लीक झाला? मी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या मुलावर टीका केल्यामुळेच हा व्हिडीओ आता लीक करण्यात आला आहे का? की विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे?” असे सवाल संजय कुमार यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत भगीरथविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सविस्तर चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, संजय कुमार यांनी मुलाची पाठराखण केली आहे. “मुलं कधीकधी एकमेकांशी भांडतात. पण नंतर पुन्हा एकत्र येऊन मित्रही होतात. त्या मुलानंही त्याचीच चूक होती, असा व्हिडीओ जारी केला आहे. तरीही हा सगळा वाद निर्माण केला जात आहे”, असा आक्षेप संजय कुमार यांनी नोंदवला आहे.