बेंगळुरू – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यावर “सिद्दू निजाकनासुगलु”नावाने एक पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. त्या पुस्तकाला सिद्धरामय्या यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे पुस्तक लिहीण्यात आले आहे आणि त्या मागे भाजपचीच प्रेरणा आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा आपण विचार करत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीनेही या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुस्तकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या काळातील कथित कुशासन आणि त्यांचे “तुष्टीकरणाचे राजकारण” यावर लिखाण आहे. यात काही वादग्रस्त आणि जातीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दे आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाशी संबंधित घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या संबंधात सिद्धरामय्या म्हणाले, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांच्या डोळ्यांना सगळेच पिवळे दिसते असाच हा प्रकार आहे. आपल्याला टिपु सुलतानचे समर्थक म्हणून या पुस्तकात हिणवण्यात आले आहे. वास्तविक माजी मुख्यमंत्री व भाजप नेते येडियुरप्पा यांनीच टिपु सुलतान वरील एका पुस्तकाला प्रस्तावना लिहून त्यांची भलामण केली आहे हा दुट्प्पीपणा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
निवडणुकीपूर्वी माझी बदनामी करणे हाच या पुस्तकामागील एकमेव उद्देश आहे असेही ते पुढे म्हणाले. एका पोस्टरमध्ये पुस्तकांच्या प्रती दाखवल्या आहेत ज्यांच्या मुखपृष्ठावर सिद्धरामय्या यांनी टिपू सुलतानसारखा पोशाख परिधान केलेला आणि तलवार धरलेली दिसत आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन उच्च शिक्षण मंत्री सी. एन अश्वथ नारायण यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते होणार आहे. भाजप आमदार चलवादी नारायणस्वामी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कायदेशीर कक्षाने या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास ती रद्द करावी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थित लक्षात घेऊन आयोजकांना परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. सद्भावना आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतूने कट रचून सिद्धरामय्या याची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे असा आरोपही पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.