मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतलं आहे.
30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवलेला आहे. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 7.9 कोटींची कमाई केली आहे. यापुढे ही चित्रपट जोरदार कमाई करणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, ‘वेड’चे यश आणि मनोरंजन कारकिर्दीची 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता रितेश देशमुखला आपला मित्र दिग्दर्शक निशिकांत कामतची आठवण आली असून, यावेळी रितेश भावूक देखील झाल्याचं दिसून आलं. “आज निशिकांत असता तर वेडचे दिग्दर्शन त्यानेच केले असते’. असं रितेश यावेळी म्हणाला आहे.
नेमकं रितेश काय म्हणाला… “माझा मराठी मधील पहिला चित्रपट ‘लय भारी’चे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते आणि या चित्रपटाआधी मी आणि निशिकांतने एकत्र एका चित्रपटासाठी काम केले होते. मात्र, काही कारणामुळे तो चित्रपट आला नाही, पण आमच्या दोघांची मैत्री घट्ट होत गेली. ‘वेड’ चित्रपट करायचा हे माझ्या डोक्यात होते, पण त्याचे दिग्दर्शन मी करेन असं मी ठरवलं न्हवतं. त्यामुळे जर आज निशिकांत असता तर ‘वेड’च्या पोस्टरवर दिग्दर्शक म्हणून त्याचेच नाव झळकले असते’. असं यावेळी रितेश म्हणाला.