पुणे : खून झालेल्या व्यक्तीचा कोणताही पुरावा नसताना, केवळ हातावरील टॅटू आणि अंगावर घातलेल्या शर्टावरून त्याची ओळख पटवून खूनाचा छडा लावला.गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने खून करणार्यांना जेरबंद केले आहे.
मद्यप्राशन करून बहीण आणि कुटूंबियांना त्रास देत असल्याच्या कारणातून दाजीने साडूसोबत मिळून आपल्या मेव्हण्याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना गुरूवारी (दि.28) रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास सुस खिंड परिसरात बाणेर रोड जवळील गोठ्याजवळ घडली आहे. संदीप शंकर शिंपी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी, रामभाऊ गिर्हे (रा. शितलादेवी मंदीराजवळ म्हाळुंगे), दिपक विठ्ठल कोळेकर (रा. पॅनकार्ड क्लब रोड चाकणकर चाळ बाणेर) या दोघांना अटक केली आहे. दोघांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सुस खिंड परिसरात एका निर्जनस्थळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना मिळाली होती. गस्तीवरील मार्शलने जावून पाहिले असता, मृतव्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले. चतुःश्रृंगी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान मृत व्यक्तीजवळ त्याची ओळख पटविली जाईल असा एकही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर त्याची ओळख पटविण्यापासून ते खून्यांना अटक करण्याचे आव्हान उभे ठाकले होते.
गुन्हे शाखा युनिट चारचे पथक पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होते. मृत व्यक्तीच्या शरीराची पाहणी केली असता, त्याच्या हातवार एस नावाचा टॅटू होता तर अंगावर एका मॅरेथॉन स्पर्धेतील टी शर्ट घातलेला होता. पोलिसांनी त्याचा अंगावरील टी शर्टचा फोटो काढून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले होते. पॅन कार्ड क्लब परिसरात पोलिस माहिती काढत असताना, असा शर्ट घालणारा एक व्यक्ती येथील परिसरात राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचे घर शोधून काढून त्याची माहिती विचारली. त्यावेळी घरच्यांनी तो काल रात्रीपासून घरी आला नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्या हातावरील टॅटू दाखविला. तेव्हा तो संदिप शिंपी असल्याचे घरच्यांनी सांगितले. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आपले खबरी कामाला लावून तो रात्री कोणाबरोबर गेला होता याची माहिती काढली. तेव्हा एका बुलेटवाल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बुलेट सतिश आणि दिपक घेऊन गेल्याचे सांगितले. त्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत शिंपी हा त्याच्या बायकोला म्हणजेच सतिश याच्या बहीणीला दारु पिऊन सतत मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच सतीश याच्या घरच्यांना देखील दारुच्या नशेत शिवीगाळ करून दमदाटी करत होता. गेल्या काही दिवसापासून त्याचा हा प्रकार वाढला होता. सतत होणार्या त्रासामुळे सतिश याने मेव्हणा शिंपी याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने त्याचा साडू भाऊ दिपक याला सोबत घेऊन, रात्री दारु पिल्यानंतर शिंपी याला दुचाकीवर बसवून सुस खिंड येथील एका निर्जनस्थळी नेले. तेथे त्याचा डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. ही कामगिरी, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील कर्मचारी अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी यांच्या पथकाने केली.