मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीतुन भाजपसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या आई हिराबाई पडळकर सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. दरम्यान, निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. मात्र तालुक्यातील निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीमध्येही सरपंचपदासाठी देखील निवडणूक लागली होती. यात हिराबाई पडळकर विजयी झाल्या आहेत.
पडळकरवाडीमध्ये प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांची नोव्हेंबरमध्ये बैठक देखील पार पडली होती. ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. पण तालुक्यातील निवडणुकांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यानंतर पडळकरवाडीतही सरपंच पदासाठीही निवडणूक लागली. त्यातही भाजपने आपले वर्चस्व कायम राखल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर विराजमान झाल्या आहेत.