मुंबई – टाइमपास सिनेमातील हिरो दगडू म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता ‘प्रथमेश परब’. टाइमपास असो किंवा टकाटक 2 प्रथमेशच्या सगळ्या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रथमेशनं मराठी सिनेसृष्टीत स्वत:अशी वेगळी ओळख निर्माण केली असून, सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र, सध्या हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
लवकरच अभिनेता ‘प्रथमेश परब’ लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. स्वतः प्रथमेशने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्यात आहेत. प्रथमेशने चक्क नवरोबाच्या लूकमधला स्वतःचा फोटो शेअर करत लग्नाचं निमंत्रणच पाठवलं. फोटोवर लिहिलं आहे की, “आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय.’ असं तो म्हणाला आहे.
हा फोटो शेअर करताना त्याने असं कॅप्शन दिलं की, ‘सगळेच विचारतायेत… विचार केला सांगूनच टाकू. गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा.!’ #Surprise असा हॅशटॅग देत अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो खरंच लग्न करतोय की त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनची स्ट्रॅटेजी आहे. हे आता येणाऱ्या दोन दिवसात सर्वांना समजणार आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.