पारगाव -दौंड तालुक्यातील पुणे स्टेशन – वाघोली – पारगाव पीएमपीएमएल बससेवा दोन दिवसांत पुन्हा सुरू न झाल्यास पारगाव, देलवडी, पिंपळगाव, राहु, देवकरवाडी, पाटेठाण, अष्टापूर ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) पारगाव चौक या ठिकाणी शिरूर – सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पोपटराव ताकवणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील सुरू केलेले काही मार्ग बंद केले आहेत.
दौंड तालुक्यातील पुणे स्टेशन – वाघोली – पारगाव या मार्गाचाही समावेश आहे. या मार्गावर बस सेवा सुरू झाल्याने पुणे, देहू, आळंदी आदी ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, विद्यार्थ्यांना प्रवास करणे अगदी सुलभ झाले होते. परंतु पीएमपीएमएलने हा मार्ग बंद केल्याने सर्वांचे हाल होऊ लागले आहेत.
त्यामुळे विद्यार्थी व नोकरदार वर्गाचे नुकसान झाले आहे. एस. टी. महामंडळ ही सेवा देऊ शकणार नाही. या अनुषंगाने दोन दिवसांत पुन्हा बस सेवा पुन्हा सुरू करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पोपटराव ताकवणे यांनी सांगितले.
सध्या ट्रायल बेसवर एस. टी. बससेवा सुरू केली आहे. सकाळी सहा वाजता पुणे ते पारगाव, पारगाव ते वाघोली, वाघोली ते पारगाव व पारगाव ते पुणे अशी फेरी सुरू केली आहे. त्यास प्रतिसाद मिळाल्यास जास्त फेऱ्या वाढविल्या जातील.
– अनिल भिसे, व्यवस्थापक, शिवाजीनगर पुणे