मुंबई – बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांना चितपट करत छप्पर फाड कमाई करणारा कांतारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून सब्स्क्रिप्शन असणाऱ्या प्रत्येकाला आता हा चित्रपट फ्रीमध्ये पाहता येणार आहे.कांतारा या चित्रपटाला सेलिब्रिटींपासून समीक्षकांपर्यंतही दाद मिळाली आहे. त्याचे चित्तथरारक व्हिज्युअल आणि कथेने सर्वांची मने जिंकली आहेत. कदाचित त्यामुळेच इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तीनशे कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
ऋषभ शेट्टीच्या कन्नड चित्रपट कांताराने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तसेच हिंदी भाषेतही जबरदस्त कमाई केली आहे. सुमारे 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडत नवीन उंची गाठली. सस्पेन्स आणि जबरदस्त थ्रिलर असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘कंतारा’ ओटीटीवरही रिलीजसाठी सज्ज आहे.
कांताराची ओटीटी रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच आजपासून OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होणार आहे. हिंदी भाषेतील प्रेक्षकांना मात्र याचा काहीही फायदा होणार नाही कारण चित्रपट केवळ मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. हिंदीतील प्रेक्षकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.