उत्तर प्रदेशात रिक्त झालेल्या तीन जागांपैकी मैनपुरी लोकसभेच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक अधिक महत्त्वाची आहे. समाजवादी पक्षासाठी तर ही प्रतिष्ठेची जागा आहे. अखिलेश यादव यांनी या जागेवर सपाचे उमेदवार म्हणून त्यांची पत्नी डिंपल यादव यांना रिंगणात उतरवले आहे. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर ही जागा जर डिंपल यांनी जिंकली तर त्या मुलायम सिंह यांच्या जागेच्या वारसदार ठरतील.
उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत गोला गोकरनाथ ही जागा भाजपाच्या खात्यात गेल्यानंतर आता लोकसभेच्या एका जागेसाठी आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. यातील विधानसभेच्या दोन जागा सध्याच्या आमदारांना न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा सुनावल्यानंतर रिक्त झाल्या आहेत तर लोकसभेची जागा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. मैनपुरी मतदारसंघ समाजवादी नेते पुरोधा यांच्या निधनामुळे आणि रामपूरची जागा सपा नेते आजम खॉं यांना तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर रिक्त झाली.
मुझफ्फर खतौलीची जागा भाजपाचे विक्रम सिंह सैनी यांना दंगली प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या तीन जागांपैकी मैनपुरी लोकसभेच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक अधिक महत्त्वाची आहे. समाजवादी पक्षासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. या जागेवर समाजवादी पक्षाचा जय-पराजय मुलायम सिंह यांच्या निधनानंतर अखिलेश यादव यांची वोट बॅंकेवरची पकड किती घट्ट आहे हे सिद्ध करणारा असेल.
अखिलेश यादव यांनी मैनपुरीच्या या जागेवर सपाचे उमेदवार म्हणून त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर ही जागा आता कोण लढवणार, त्यांच्याच कुटुंबातील कोणी लढवणार की बाहेरची व्यक्ती लढवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू होती. डिंपल यांचे नाव पुढे आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र शिवपाल यादव यांच्यासाठी हा धक्का आहे. कारण शिवपाल यांना ही जागा त्यांच्याकडे सोपवली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र डिंपल यांचे नाव पुढे आल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील कलह पुन्हा चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही माध्यमांनी ही जागा तेज प्रताप यादव यांना मिळणार, असे चित्र रंगवले होते. अनेक ठिकाणी तर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
डिंपल यादव यांच्याबाबतीत विचार केला तर त्या मुलायसिंह यादव यांची सून तर आहेच शिवाय त्या कनौजमधून समाजवादी पक्षातर्फे लोकसभेत खासदारही राहिलेल्या आहेत. 2012 मध्ये अखिलेश यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर कनौज लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर डिंपल यादव यांचा बिनविरोध विजय झाला होता. डिंपल यादव या कनौज लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या. त्यापूर्वी 1984 मध्ये शीला दीक्षित कनौजची निवडणूक जिंकल्या होत्या. डिंपल यादव यांना मागील काळात एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अखिलेश यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली फिरोजाबादची जागा 2009 मध्ये डिंपल यांनी लढविली होती. मात्र तेव्हा कॉंग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांनी डिंपल यांचा पराभव केला होता. 2012च्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि बसपाने उमेदवार उभे केले नसल्याचा फायदा डिंपल यांना मिळाला होता. त्याचबरोबर भाजपाच्या उमेदवाराचे अंतिम वेळेपर्यंत नामांकनच केले गेले नव्हते. त्यामुळेच डिंपल या बिनविरोध जिंकल्या. तसेच या निवडणुकीत उतरलेले संयुक्त समाजवादी दलाचे उमेदवार दशरथ शंखवार आणि अपक्ष उमेदवार संजू कटियार यांनी आपली नावे मागे घेतली आणि डिंपल यादव बिनविरोध निवडून आल्या.
कनौज निवडणूक अनेक बाबतीत ऐतिहासिक ठरली. बिनविरोध निवडून येणाऱ्या डिंपल या देशातील 44वी व्यक्ती ठरल्या होत्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ चौथी व्यक्ती बिनविरोध निवडून आली होती. 1952 मध्ये प्रयागराज (अलाहाबाद पश्चिम) मधून पुरुषोत्तम दास टंडन हे निवडून आल्यानंतर डिंपल या दुसरी व्यक्ती ठरल्या. डिंपल या एकमेव खासदार होत्या ज्यांचे पती मुख्यमंत्री आणि सासरेसुद्धा लोकसभेत खासदार होते.
डिंपल या कुशल गृहिणी आहेत. तसेच राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा जोरदार प्रचार केला होता. अनेक रॅली आयोजित करून स्वतः पुढाकार घेऊन प्रचारात आघाडी मिळविली होती. त्यांच्या भाषणांचा लोकांवर प्रभाव पडला होता. डिंपल या महिलांच्या मुद्द्यांवरसुद्धा जोर देऊन नेहमीच बोलत असतात. त्यांनी समाजवादी पक्षाद्वारे सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षा 100 हेल्पलाइनचेही समर्थन केले आहे.
डिंपल यादव यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या संयुक्त उमेदवाराच्या रूपात कनौजची निवडणूक लढविली होती. मात्र भाजपाच्या सुब्रत पाठक यांच्याकडून 10 हजार मतांच्या फरकाने डिंपल यांचा पराभव झाला होता. डिंपल यांचा झालेला हा पराभव समाजवादी पक्षासाठी मर्मावर वार होता. कारण ही जागा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होती. आता डिंपल यादव मैनपुरी लोकसभा जागा लढवत आहे. ही जागा जर डिंपल यांनी जिंकली तर त्या मुलायम सिंह यांच्या जागेच्या वारसदार ठरतील.
डिंपल यांचा जन्म 15 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल राम चंद्र सिंह रावत आणि चंपा रावत यांच्या तीन मुलींपैकी डिंपल दुसऱ्या नंबर मुलगी. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे रहिवाशी. पुणे, बठिंडा, अंदमान आणि निकोबार बेट तसेच आर्मी स्कूल, लखनौ अशा विविध ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी मिळविली आहे.
डिंपल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर साहजिकच भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्ष घराणेशाही जोपासत असल्याचे डिंपल यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट होते. समाजवादी पक्ष घराणेशाहीतून बाहेर पडायला तयार नाही, असे भाजपाने म्हटले आहे. आता मैनपुरीच्या जागेवर भाजपाचाच विजय निश्चित आहे, असा दावा भाजपाने केला आहे. निवडणूक आयोगाने देशाच्या विविध राज्यांमध्ये रिक्त झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची तारीख घोषित केली आहे. या जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होईल. तर 8 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसोबतच मतमोजणी केली जाईल. मैनपुरी जागेसाठीही याच तारखांना मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांबरोबरच उत्तर प्रदेशातील निकालही महत्त्वाचा आहे.
– अमित शुक्ल