नगर – दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात दहा टक्के दरवाढ करत प्रवाशांना झटका देणाऱ्या महामंडळाने आता मात्र दिलासा दिला आहे. दिवाळी संपताच एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला असून तिकीट दर पूर्ववत करण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नगर ते पुणे बस तिकीट 175 रुपये झाले आहे. याआधी 195 रुपये घेतले जात होते.
दिवाळी सणात बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असते. या काळात महामंडळाकडून जादा वाहतूक केली जाते. तसेच उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने भाडेवाढ केली जाते. त्यानुसार यंदा दिवाळीत दहा टक्के भाडेवाढ केली होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील लोकांना पुण्याला जाण्यासाठी 195 रुपये द्यावे लागत होते. तिकीट दरात 20 रुपये वाढले होते.
तर मुंबईसाठी 450, कल्याण 350 रुपये भाडे आकारणी करण्यात आली. दिवाळीपूर्वी साध्या व जलद गाडीसाठी प्रति टप्पा भाडे 8 रुपये 70 पैसे होते, तात्पुरत्या दरवाढीमध्ये प्रति टप्पा भाडे 9 रुपये 70 पैसे प्रति टप्पा करण्यात आले होते. आता मात्र तिकीट दर पूर्ववत करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या काळापर्यंत ही भाडेवाढ करण्यात आली होती.