जळोची – शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे, असे असताना शिंदे गट बाळासाहेब ठाकरेंच्या नावासह चिन्हाची मागणी करीत आहेत.
मात्र आमचे त्यांना आवाहन आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला लगावला.
आमदार अमोल मिटकरी नुकतेच बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जनसंघ, कॉंग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्याठिकाणी आहे.
तेथे शिवसेनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतिक आहे. तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतिक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनाला पाठिंबा असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.