पुणे, दि. 2 – चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्यामुळे महामार्गासह आसपासच्या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. ब्लास्टनंतर राडारोडा उचलून वेळेतच रस्ता खुला करण्याचे आव्हान होते. मात्र, पुलाचे पाडकाम आणि आणि राडारोडा उचलण्यास थोडासा उशीर झाला. यामुळे नियोजनापेक्षा दोन तास उशिरा म्हणजेच तब्बल 11 तास पोलीस आणि प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.
दि. 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री हा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी मुंबई-पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक देहु, बाणेर; तर वारजे, धायरी, कात्रज येथून शहरांतून पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली. शनिवारी (दि.1) रात्री 11 वाजता या चौकातील वाहतूक बंद करण्यात आली. रविवारी सकाळी 8 वाजता वाहतूक सुरळीत करण्याचा प्रशासनाचा निर्धार होता. मात्र, पुलाचे स्ट्रक्चर आणि बांधकाम पाहता ब्रेकर, जेसीबीच्या मदतीने काम वेळेत उरकत नसल्याचे दिसून आले.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, डॉ. विवेक मुगळीकर, शहाजी पवार यांनी विशेष लक्ष देत काम तत्काळ पूर्ण करून वाहतूक टप्याटप्याने पुढे आणून सकाळी 10 वाजता महामार्ग सुरू केला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लाऊन, वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. टप्प्याटप्याने वाहने पर्यायी मार्गाने सोडल्यामुळे आणि रात्रीची वेळ असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास पोलिसांना यश आले.
पोलिसांचे चोख नियोजन
रात्री 11च्या आधीच चांदणी चौकाच्या दोन्ही बाजूंच्या मार्गांवरील वाहतूक मागेच थांबवण्यात आली. त्यामध्ये देहू, उर्से आणि खालापूर टोल नाका येथे जड वाहने थांबविण्यात आली. तर सातारा मार्गावर खेडशिवापूरला वाहने थांबविण्यात आली. मात्र, एकाचवेळी वाहने सोडल्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे उपायुक्त आनंद भोईटे आणि पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी जड वाहनांनाही शहरातील पर्यायी मार्गाने पाठवले. तसेच एकाच ठिकाणी वाहने न थांबवता, टप्याटप्याने पुढे नेल्यामुळे कोंडी टळली.