माऊली पद्मावती देवीच्या भेटीला
आळंदी – वशपरंपरेप्रमाणे नवरात्रोत्सात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी टाळ-मृदंगाच्या गजरात देवूळवाड्यातून पद्मावती देवीच्या भेटीला गेली. पद्मावतीच्या निसर्गरम्य वातावरणात आळंदीकरांना पद्मावती आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शनाचा दुहेरी लाभ मिळाला.
नवरात्रोत्सवाची अश्विन शुद्ध पंचमी असल्याने पाचवी माळ होती. या निमित्ताने दुपारी साडेबाराच्या सुमारास माऊलींची पालखी आळंदीकर ग्रामस्थांनी खांद्यावर घेत देवूळवाड्यातून बाहेर काढली. महाद्वार, चावडी चौक, पद्मावती रस्ता मार्गे पालखी पद्मावती ओढा ओलांडून पद्मावती देवीच्या मंडपात पोहोचली. याठिकाणी वारकरी विद्यार्थी, ग्रामस्थांनी भजन केले.
भाविकांनी पद्मावती आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास माऊलींची पालखी पद्मावती मंदिरापासून मार्गस्थ होत विश्रांतीवडमार्गे पुन्हा देवूळवाड्याकडे माघारी निघाली.
यावेळी वडगाव चौकातील भोसले निवासमधे माऊलींच्या पालखीचा सायंकाळचा विसावा झाला. यावेळी भोसले कुटुंबीयांकडून भोजन प्रसाद देण्यात आला. त्यानंतर मंदिरात पालखी रात्री पावणे आठला पोहोचली. त्यांतर आरती झाल्यानंतर मानकऱ्यांना प्रसाद देवस्थानकडून देण्यात आला.