पुढील काही महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसाठी अनेक इच्छुक सण, उत्सवांमधून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याचाच फायदा घेऊन काही गुन्हेगारी चेहरे आपल्या कुरापती वाढवून शहरातील वातावरण गढूळ करण्याची शक्यता आहे. काही गुंड यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष उतरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईतांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत.
गुन्हेगाराचे पूर्ण व टोपण नाव, वय, शिक्षण, कामाच्या ठिकाणचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक, सध्याचा व मूळ गावचा पत्ता, एकूण दाखल गुन्हे, गुन्हेगाराची सवय, नातेवाईकाचे नाव, पत्ता, व्यवसाय आणि मोबाइल क्रमांक, गुन्हेगाराच्या साथीदाराचे नाव, वय, शिक्षण पत्ता आणि मोबाइल क्रमांक, साथीदारावर दाखल असलेले गुन्हे, गुन्हेगारांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन आणि त्याचा स्रोत यासह काही गोपनीय माहिती पोलिसांनी जमा केली आहे.
मागील काही दिवसांत दीड हजार पेक्षा अधिक गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. चिंचवड, भोसरी, चाकण, तळवडे, तळेगाव परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये कंत्राटासाठी दादागिरी करणा-यांचीही माहिती पोलिसांनी काढली आहे. पोलीस आयुक्तांकडे 50 पेक्षा अधिक जणांची माहिती गोपनीयरित्या आली आहे. आयुक्तालय हद्दीत 60 गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यातील बाळू वाघेरे, राकेश भरणे, वाघ्या मारणे, रावण, विकी घोलप, सचिन सौदाई, संतोष खलसे, शाहरुख खान, साहिल जगताप, महेमूद कोरबू , महेश डोंगरे, पिंटू जाधव, अवधूत गाढवे, स्वप्नील शिंदे, मयूर उर्फ बंटी टकले, करण रोकडे या 16 टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
ईपेपर । राशी-भविष्य । लोकसभा निवडणुक । Trending
Copyright © 2022 Dainik Prabhat