किव्ह – रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप कायम आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. हा संघर्ष संपण्याची चिन्ह अद्यापही दिसून येत नाही. रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला चढवत युद्धाला सुरुवात केली. यामध्ये युक्रेनमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनमधील हजारो नागरिक आणि सैनिक मारले गेले असून मोठा विध्वंस झाल्याचे चित्र आहे.
सहा महिन्यानंतर रशियाने आता बऱ्याच भागावर ताबा मिळवला आहे. त्यातही पूर्वेकडे त्यांचा दबदबा मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या काही दिवसात कीव्ह आणि युक्रेनच्या मोठ्या शहरांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले होते. आता या भागाच्या बहुतांश भागातून रशियाला काढता पाय घ्यावा लागत आहे. रशियाच्या फौजांनी लुहान्सक भागावर ताबा मिळवला आहे आणि डोन्स्टेक भागावर ते ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. खारकीव्ह शहरात कितीतरी मोठ्या प्रमाणात हल्ले झाले होते.
मे महिन्यात मारियोपोल भागातील ऐझ्वाल स्टीलवर्क्समधून युक्रेनने त्यांचे सैन्य मागे घेतले होते. यात मोठ्या रक्तपातानंतर क्रिमिआकडे जाणाऱ्या भागावरही ताबा मिळाला आणि अझोवच्या समुद्रावर पूर्णपणे ताबा मिळाला. क्रिमिआवर अजुनही रशियाचा ताबा आहे. ऑगस्टमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. सिब्स्टोपोलच्या बाहेर बेलबाक एअरबेसच्या बाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. त्याचा वापर युक्रेनच्या विरुद्ध आक्रमणासाठी करण्यात आला होता. रशियाने हल्ला केल्यावर त्यांनी सर्वप्रथम खेरसन भागावर ताबा मिळवला होता. मात्र युक्रेनने त्यांचा भाग परत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला.
हजारो लोकांचा मृत्यू
या युद्धात आतापर्यत किती लोक मारले गेले याची आकडेवारी अनिश्चित आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 10 ऑगस्टपर्यंत या युद्धात 13,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती अमेरिकेतील एका संस्थेने दिली असून ती राजकीय हिंसाचाराच्या नोंदी ठेवते.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा आकडा अतिशय कमी सांगितला आहे. युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांच्या मते हा आकडा हजारोंच्या घरात आहे. मात्र त्यांच्या दाव्याची पुष्टी केली जाऊ शकत नाही आणि स्वतंत्रपणे पडताळणी करता येऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या मते या संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेल्या देशांनी दिलेल्या आकडेवारीवर विश्वास ठेवता येणार नाही.
लाखो नागरिकांचे पलायन
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 1.2 कोटी लोकांनी पलायन केले असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. 50 लाख लोक शेजारच्या देशात गेले आहेत. तसेच 70 लाख लोक युक्रेनमध्येच विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे काही लोक लुहान्सक आणि डोन्स्टेक भागातून रशियाला पळून गेले. मात्र अनेक विस्थापित लोक त्यांच्या मायदेशी परतले आहेत. विशेषत: कीव्ह सारख्या शहरात.
किती नुकसान झाले?
सहा महिन्यानंतर युद्धामुळे युक्रेनचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. युक्रेनमध्ये सर्व ठिकाणी इमारतींचे अवशेष दिसतात. या संपूर्ण युद्धात 8 जूनपर्यंत सुमारे 39 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे, असा अंदाज कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने वर्तवला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार युद्धाच्या दरम्यान 104 बिलियन डॉलरचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता आहे.
जागतिक अन्नधान्यावर परिणाम
या युद्धामुळे मोठे अन्नसंकट निर्माण झाले आहे. अनेक देश युक्रेनवर गव्हाच्या निर्यातीसाठी अवलंबून असतात. मात्र रशिया हा मार्ग फेब्रुवारीपासून अडवून ठेवत आहे. सहा महिन्यानंतर युक्रेनला निर्यात पुन्हा सुरळीत करायला परवानगी दिली आहे. या करारानुसार निर्यातीचा माल असलेल्या बोटींवर हल्ला करणार नाही, असे आश्वासन रशियाने दिले आहे. तर कार्गो बोटींना योग्य मार्ग दाखवणार असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.