नवी दिल्ली – टीकटॉक स्टार आणि भारतीय जनता पार्टीची नेता सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फोगट यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हरियाणातील हिसार येथे राहणाऱ्या फोगट यांना गोव्यात मंगळवारी संशयास्पदपणे हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, शव विच्छेदनासाठी दोन तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली होती. मात्र आपल्या बहिणीच्या दोन सहकाऱ्यांनी तिची हत्या केली आहे, असा आरोप फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका याने केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आपण शव विच्छेदनाची परवानगी देणार नाही असेही त्याने म्हटले होते.
सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हरियाणा येथील फार्म हाऊसवरून सीसीटीव्ही कॅमेरा, लॅपटॉप आणि अन्य महत्वाचे साहित्या गायब असल्याचेही त्याने सांगितले. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्या भोजनात काहीतरी मिसळून त्यांचे लैंगिक शोषण केले होते व नंतर त्यांना ब्लॅकमेलही केले होते असा ढाका याचा आरोप आहे. सोनाली यांच्या अन्य नातलगांनीही पोस्ट मॉर्टेमची मागणी केली होती व या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रण केले जावे असे म्हटले होते.