काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला येत्या ऑगस्ट महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाने तालिबानला तेथील सरकार म्हणून अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. त्यासंदर्भातील चर्चाही सुरू केलेली नाही, असे अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू यांनी अलिकडेच दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
काही देशांनी अफगाणिस्तानबरोबरचे संबंध सर्वसामान्य करायला प्रारंभ केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशान तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आता तालिबानने विधायक भूमिका घेणे गरजेते आहे, असे लू म्हणाले.
तालिबानला मान्यता देण्याबाबत सर्वमान्यता निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये रशिया, चीन आणि इराणला सहभागी करून घेतले जावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे. त्यामुळे तालिबानला मान्यता देण्याबाबत आता तरी काहीही सांगता येऊ शकत नाही, असेही लू म्हणाले.
तालिबानी राजवटीने अफगाणिस्तानमधील महिलांवर मोठे निर्बंध लावले आहेत. हिजाब सक्ती, प्रवास बंदी, शिक्षण बंदी यासारख्या निर्बंधांमुळे तालिबानी धोरणांवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका होते आहे.