ज्ञानेश्वर फड/प्रितम पुरोहित
नातेपुते – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सोमवारी तेरावा दिवस. माउलींची पालखी सोमवारी (दि.4) बरड मुक्कामानंतर सोलापूर जिल्ह्यात नातेपुतेकडे मार्गस्थ झाली. पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते येथे आहे. वारीच्या वाटेवर भाविक हे वारकऱ्यांना जेवण, नाश्ता, पाणी वाटप करत असतात. पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण आदी ठिकाणी वाटप करण्यात येते. दरम्यान नातेपुते मुक्कामाआधी शिखर शिंगणापूर फाटा, मोरोची या ठिकाणी वारकऱ्यांना पिठलं, भाकरी, खर्डा अशी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या भोजनासाठी 400 महिला दिवसभर भाकरी बनवत होत्या.
नांदेड जिल्ह्यातील रामीनवार कुटुंब हे गेली सहा वर्षांपासून ही सेवा करतात. एक लाखाहून अधिक वारकरी जेवतील अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी 12 टन ज्वारी, दीड टन बेसन पीठ, 1 टन मिरची आणली होती. दरम्यान, 11 हजार लिटर दूध आणि 15 क्विंटल साखर वापरून वारकऱ्यांसाठी चहाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मोरोची येथील सूळ कुटुंबीयांनी त्यांना जेवण बनवण्यासाठी आणि वाटपासाठी जागा उपलब्ध करून दिली.
विठ्ठलाने आम्हाला भरभरून दिले आहे. वारकऱ्यांची सेवा केल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. संसारातील सुखापेक्षा कितीतरी पटीने आम्हाला वारकऱ्यांची सेवा केल्याने आनंद वाटतो, अशी भावना रामीनवर दाम्पत्य भारत रामीनवार आणि मीरा रामीनवार यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
भोजनासाठी वापरलेले साहित्य
12 टन ज्वारी, दीड टन बेसन, 1 टन मिरची, अर्धा टन टोमॅटो, 2 क्विंटल लसूण, 2 क्विंटल शेंगदाणे, रिफाईंड तेल, 23 टन सरपण.
पुरंदवडे येथे गोल रिंगण
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मंगळवारचा मुक्काम नातेपुते येथे असणार आहे. मंगळवारी (दि. 5) पालखी सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ होईल. माळशिरस मुक्कामाआधी पुरंदवडे याठिकाणी माउलींच्या पालखी सोहळ्यातील पाहिले गोल रिंगण होणार आहे.
वारकऱ्यांची सेवा करताना आनंद
आम्ही बनवलेली भाकरी वारकऱ्यांनी खाल्ली की आम्हाला खूप आनंद वाटतो. सकाळपासून आम्ही भाकरी बनवत आहोत. वारकऱ्यांची सेवा करताना खूप आनंद वाटतो, अशी भावना भाकरी बनवणाऱ्या महिलांनी व्यक्त केली.