पिंपरी – मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया होऊनही मंजुरी न मिळाल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांची टंचाई होती. मात्र तीन महिन्यानंतरही रुग्णालयांमध्ये औषधांची टंचाई कायम आहे. यामुळे रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर असल्याने शहराच्या विविध भागातून या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात. त्याचप्रमाणे वायसीएममध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह राज्यभरातून गोर-गरीब रुग्ण फक्त उपचारासाठी शहरात येतात. पिंपरी चिंचवड शहरातील शिधापत्रिका आणि ओळखपत्र दाखविल्यास नागरिकांना मोफत उपचार आणि औषधे मिळतात.
ज्या रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाणे परवडत नाही, असे रुग्ण वायसीएम रुग्णालयात येतात. या रुग्णालयातील ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) मध्ये दररोज एक हजाराहून अधिक रुग्ण येतात. यामध्ये वृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
वृद्ध नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी व्याधींनी ग्रासलेले असते. वय झाल्यानंतर कुटुंबावर औषधांच्या खर्चाचा भार नको म्हणून ते वायसीएम रुग्णालयात डॉक्टरकडून तपासणीसाठी तास्नतास उभे राहून औषधे लिहून घेतात. मात्र औषध देण्याच्या खिडकीवर आल्यावर त्या ठिकाणी औषधेच उपलब्ध नसल्याचे समजते. सध्या वायसीएम रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यापासून मधुमेह, फीट येणे याची औषधेच उपलब्ध नाहीत.
डॉक्टर व औषध विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव
अंगदुखी, डोकेदुखी किंवा इतर दुखण्यावर डॉक्टरांकडून रुग्णांना पेनकिलर गोळ्या लिहून दिल्या जातात. मात्र सध्या ज्या गोळ्या उपलब्ध नाहीत त्याच गोळ्या औषधांच्या यादीत डॉक्टर टाकत आहेत. ज्या पेनकिलर गोळ्या उपलब्ध आहेत त्या लिहून देणे डॉक्टरांनी गरजेचे आहे. मात्र डॉक्टर व औषध विभाग यांच्यात समन्वय नसल्याने अशा घटना घडत आहेत. मात्र डॉक्टरांनी दिलेली गोळी नसल्याचे औषध वितरण करणारे सांगत असल्याने रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागते.