पिंपरी – पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढल्याने मोठ्या संख्येने चारचाकी वाहनचालक सीएनजी किट बसवून घेत आहेत. परंतु सीएनजी किटची मागणी वाढताच ओरिजनल सीएनजी किटचे दरही प्रचंड वाढले. चार महिन्यांपूर्वी 45 हजार ते 51 हजार रुपये खर्च येत होता. आता हा दर थेट 95 हजारांपर्यंत पोहचला असल्याने अनेकांनी डुप्लिकेट किट बसविण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे अनधिकृतपणे सीएनजी किट बसविणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही वेगाने वाढली आहे. अगदी रस्त्याच्या कडेला टपरी टाकून बनावट किंवा जुने सीएनजी किट बसवून दिले जात आहे. वाहनांच्या संरचनेत परवानगी न घेता बदल केल्यास अशा वाहनांवर पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अनधिकृत सीएनजी किटवर कारवाई केली जात नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत मायलेज जास्त मिळत असल्याने आता सीएनजी वाहनांना मागणी वाढत आहे. कंपनी फिटेड असेल तर अडचण नाही. कंपनी फिटेड सीएनजी किट नसेल तर बाहेरून बसवून घेण्यावर वाहन धारकांचा भर असतो. सीएनजी मुळे
प्रदूषण होत नाही.
काय समस्या येऊ शकतात?
अनधिकृत, कमी पैशांमध्ये सीएनजी किट बसवत आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. सुरक्षेच्या दृष्टीने अधिकृत डीलर किंवा एजन्सीकडूनच सीएनजी किट लावावे. सीएनजी किट बसवल्यानंतर दर पाच वर्षांनी त्याची हायड्रो टेस्ट करणे गरजेचे आहे. सीएनजी किटची आरसी बुकवर नोंद नसेल, दर पाच वर्षांनी हायड्रो टेस्ट केली नसेल तर गाडीचा विमा पास होण्यास अडथळे येतात. अशा प्रकरणांमध्ये विमा नाकारला देखील जाऊ शकतो. बनावट सीएनजी किटमुळे कारचे इंजिन वारंवार काम काढते आणि लवकर खराब होते. वायर फिटिंग व्यवस्थित न झाल्यास आग लागण्याची भीती असते. डुप्लिकेट सीएनजी किटच्या वायर सतत स्पार्क तसेच खराब होतात. कारच्या कागदपत्रांवर सीएनजीचा उल्लेख नसल्यास पुढे अडचणी येतात. वाहतूक पोलीस दंड
आकारू शकतात.
काही पंपचालक गॅस भरण्यास देतात नकार
12 किलोच्या सीएनजी किटमध्ये गॅसच्या प्रेशर नुसार त्यात नऊ ते दहा किलो पर्यंत गॅस भरला जातो. कंपनी फिटेड, ओरिजिनल सीएनजी बसविल्यास त्याची एक प्लेट मिळते. ती प्लेट पाहूनच अनेक गॅस पंपावर सीएनजी भरला जातो. डुप्लिकेट किटसोबत प्लेट येत नाही. अनेक गॅस पंपावरील कर्मचारी सीएनजी किट ओरिजिनल आहे का, अशी विचारणा करतात. डुप्लिकेट किट असेल तर गॅस भरून देण्यास पंपावर नकार दिला जातो.
सीएनजीवरील गाडी पिकअप घेत नाही. पिकअपसाठी पेट्रोल मोड वापरावा लागतो. घाट, चढाईच्या वेळी सीएनजी उपयोगाला येत नाही. सीएनजी मुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शहरात सीएनजी वापरण्याला चालना मिळाली पाहिजे. पिंपरी-चिंचवड परिसरातील काही गॅस पंपावर सीएनजी किट कंपनीचे आहे का, अशी विचारणा केली जाते. जर कंपनीचे असेल तरच सीएनजी भरला जातो.
– शशिकांत शिंदे, सीएनजी वाहन चालक
अनधिकृत सीएनजी किट बसवणे धोक्याचे आहे. त्यामुळे वाहनाला आणि वाहनातून प्रवास करणाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. अशा अनधिकृत सीएनजी किटवर परिवहन विभागासोबत मिळून लवकरच कारवाई करण्यात येईल.
– आनंद भोईटे पोलीस उपायुक्त