पृथ्वीचे तापमान वाढल्याचा फटका बसला अंटार्टिका क्षेत्रालाही
लंडन : ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. जगातील सर्वात थंड प्रदेश म्हणून गणना होत असलेल्या अंटार्टिका क्षेत्रालाही पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा फटका बसला असून या क्षेत्रात महाप्रलय म्हणजेच डूमस डे या नावाने ओळखले जाणारे हिमक्षेत्र झपाट्याने वितळू लागले आहे.
गेल्या 5500 वर्षात प्रथम यावर्षी हिमनग वितळण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे संशोधनानंतर समोर आले आहे. डूमस डे किंवा महाप्रलय या नावाने ओळखला जाणारे हे हिमक्षेत्र जवळजवळ ब्रिटनच्या आकाराचे आहे. त्यामुळे या क्षेत्राचा वितळण्याचा वेग वाढला तर समुद्राची पातळी वाढणार आहे आणि त्याचा वेगळा अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे. अंटार्टिका प्रदेश दोन भागांमध्ये विभागला आहे.
पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग आहेत, पश्चिम विभागातील हिमक्षेत्र गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वितळत असल्याने त्याला महाप्रलय हिमक्षेत्र असे नाव देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनाप्रमाणे ही गोष्ट लक्षात आली आहे की, पूर्व भागातील हिम क्षेत्र सुद्धा आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वितळू लागले आहे.
साहजिकच अंटार्क्टिकातील हे दोन्ही प्रदेश जर झपाट्याने वितळू लागले तर समुद्राची पातळी वाढणार आहे. लंडनमधील इंपिरिअल कॉलेजमधील शास्त्रज्ञ डॅनियल रूल यांनी याबाबतचे संशोधन केले असून गेल्या काही वर्षांमध्ये वितळण्याचा वेग मंदावला असला तरी आता या वर्षी पुन्हा एकदा वेग वाढताना दिसत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.