वॉशिंग्टन : अमेरिकेतील बंदूक संस्कृती गेल्या काही दिवसात चर्चेत असतानाच गन खरेदीबाबत एक आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये अमेरिकेत तब्बल चार कोटी लोकांनी शस्त्राची खरेदी केली असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.
2020 मध्ये अमेरिकेत 85 लाख बंदूक आणि इतर शस्त्रांची खरेदी झाली होती, हेच प्रमाण गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये चार कोटी पर्यंत वाढले आहे. अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्या याशिवाय काही लोकप्रतिनिधी आणि कायदेशीर सल्लागार यांच्या प्रोत्साहनामुळे लोकांचा शस्त्रास्त्र खरेदीकडे कल वाढला आहे. स्वतःची सुरक्षा ठेवण्यासाठी किंवा स्टेटस म्हणून एखादे शस्त्र आपल्याकडे असावे असे प्रत्येकाला वाटत असून त्यातूनच ही खरेदी वाढली आहे.
गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांनी आपली मार्केटिंग धोरणे ही बदलली असून नागरिकांच्या पुरुषार्थाला आव्हान देण्याचे मार्केटिंग करून ते त्यांना शस्त्रास्त्र खरेदी करण्यास भाग पाडत आहे. घरात एखादे शस्त्र असणे हे पुरुषार्थाचे आणि शूरपणाचे लक्षण असल्याचे जाणीवपूर्वक नागरिकांच्या मनावर बिंबवले जात आहे.
2012 नंतर अमेरिकेतील शस्त्र खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यानंतरच अमेरिकेत अंधाधुंद गोळीबार करून लोकांना ठार मारण्याचे प्रकारही वाढले आहेत. शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांनी संपूर्ण रेकॉर्ड ठेवले असून 2016 नंतर ज्यांनी शस्त्रे खरेदी केले त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड या कंपन्यांकडे आहे. गन खरेदी करणाऱ्या लोकांचा वयोगट साधारण 40 वर्षे आहे. या वयोगटातील लोकांनी सर्वसाधारणपणे हँडगनची खरेदी केली आहे.
गन इंडस्ट्री असोसिएशनने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी गन खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. निर्जन ठिकाणी जर एखादा दरोडेखोर किंवा गुन्हेगार महिलांच्या समोर आला तर महिला आपल्या पर्समधून पिस्तूल किंवा हँडगन काढून त्याला धाक दाखवत असल्याचा घटनाही अनेक घडल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीमध्ये अमेरिकेतील ग्रामीण भागात गन खरेदीचे प्रमाण वाढले असून त्यातही कृष्णवर्णीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर गन खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे.