नांदेड – मी राज्यसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीसोबत होतो. आता विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी सोबतच असेन. उद्या आघाडीने बोलावलेल्या बैठकीला मुंबईत जाणार आहे. अजितदादा माझे नेते आहेत. ते सांगतील तिथे मी मतदान करेल. मतदान पद्धती गुप्त असल्याने माझे मत कुणाला हे मी कसे सांगेन, असे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्यसभेत शिवसेना उमेदवार संजय पवार पराभूत झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शामसुंदर शिंदे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. माझे कोणतेही काम असेल तर ते अजिदादांच्या माध्यमातून लगेच होते. सगळे मंत्री मला सहकार्य करतात. मी आघाडीसोबतच आहे. अजितदादा माझे नेते आहेत. उद्या बैठकीत ठरेल त्या उमेदवाराला मी मतदान करेल. पण कुणाला करेन, हे मी जाहीरपणे सांगणार नाही. राऊतांनी संशय घेऊ द्या, पण मी आघाडीसोबत असल्याचे अजितदादांना माहिती आहे, असे शामसुंदर शिंदे म्हणाले.