जांजगीर – छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेला राहुल आता फक्त 3 फूट दूर आहे. राहुलपर्यंत पोहोचण्यासाठी बोगदा बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र खडक लागल्याने अडथळा निर्माण झाला आहे.
या अडचणीवर मात करण्यासाठी बिलासपूर येथून मशीनरी बोलविण्यात आली आहे. मात्र, राहुलच्या सुरक्षिततेमुळे आणि माती राहूलवर कोसळण्याच्या भीतीने कामाचा वेग मंदावला आहे. त्याचवेळी राहुलला बाहेर काढण्यासाठी अद्याप 4 ते 5 तास लागतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे एनडीआरएफ दोरीच्या सहाय्याने राहुलला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप मुलाच्या बाजूने कोणतीही हालचाल झालेली नाही. मात्र तरी बचावकार्य सुरू आहे. बोअरवेलच्या खड्ड्यात पाणी साचले असून ते बादलीतून बाहेर काढले जात आहे. पण ते फार काळ शक्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पेहरीड गावातील पाणीपातळी कमी करण्यात येत आहे. जेणेकरून बोअरवेलमध्ये पाण्याची गळती कमी होईल. त्यासाठी गावातील सर्व बोअर कार्यान्वित करण्यात आले आहे. शिवाय गावात असलेले 2 बंधारे बंद करण्यात आले आहेत.
दुसरीकडे बोगद्याच्या खोदकामात मोठ्या प्रमाणात धूळ निघत आहे. त्यामुळे पाण्याचा मारा करून धुळीवर नियंत्रण मिळवले जात आहे.
पिहरीड गावातील बोअरवेलमध्ये अडकून पडलेल्या 10 वर्षीय राहुलला 72 तासांहून अधिक काळ लोटला आहे. राहुल ६० फूट खाली खड्ड्यात अडकला आहे. रविवारी सायंकाळ रोबोटिक्सची पद्धत निरुपयोगी ठरल्यानंतर रात्री बोगद्याच्या मदतीने राहुलला बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली. मात्र बोगद्याच्या मार्गात मोठा खडक आला आहे. येथे मोठे मशीन वापरल्यास आजूबाजूला कंपन होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेतले जात आहे.