मुंबई – राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 पैकी 208 नगरपरिषद आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी शुक्रवारी (10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल.
दरम्यान, राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याचे निश्चित केले आहे.