नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीची दरवाढ होत आहे. त्यानुसार भारतीय सराफातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 133 रुपयांनी वाढून 50,907 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 273 रुपयांनी वाढून 61,535 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,850 डॉलर व चांदीचा दर 21.95 डॉलर प्रति औस या पातळीवर गेला होता.
एचडीएफसी या संस्थेचे तपन पटेल यांनी सांगितले की डॉलर कमकुवत होण्याबरोबरच अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. भारतामध्ये लग्नासाठी आणि गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही सोन्याचे दर उच्चांकी पातळीपासून बरेच कमी आहेत. जर चांगला पाऊस पडला तर ग्रामीण भागातून सोन्याची मागणी आगामी काळात वाढू शकते.