नवी दिल्ली – चीनने लडाखमध्ये ज्या हालचाली आणि बांधकाम सुरू केले आहे ते भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे त्याची भारताने गंभीर दखल घेतली पाहिजे, असा इशारा अमेरिकेच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिला आहे. जनरल चार्लस ए प्लिन असे या लष्करी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला आहे.
चीनने लडाखमध्ये जे काम केले आहे त्यातून त्यांचे इरादे धोकादायक आहेत. भारताला डोळे उघडण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. चीन लडाख आणि पश्चिमी भागात हे नेमके काय करतो आहे याचा अंदाज घ्यावा लागेल असेही त्यांनी नमूद केले.
चीन लडाखाच्या अंतर्गत भागात सातत्याने नवीन रस्ते निर्माण करतो आहे. हा या भागाला अस्थिर करणारा आणि नुकसानदायक व्यवहार आहे असे ते म्हणाले. चीनच्या या हालचालींना प्रतिबंध घालण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.
ते म्हणाले की भारत आणि अमेरिकेतील सैन्यांमध्ये लवकरच एक संयुक्त सराव शिबीर होईल. हे शिबिर उंचावरील बर्फाळ पर्वतीय क्षेत्रात होण्याची गरज आहे. कारण त्यातून आपल्या जवानांनी अशा भौगोलिक स्थितीत काम करण्याचा अनुभव येऊ शकतो. सध्या त्याची आवश्यकता आहे असे चार्लस यांनी सांगितले.